Tuesday, March 31, 2009

पार्डी (तिखे) येथील जागृत श्री. गणपती देवस्थान


पार्डी तिखे हे छोटेसे गाव ता. रिसोड जि. वाशीम येथे आहे. वाशीम रिसोड मार्गावरील आसेगांव पेन पासून उत्तरेस साधारण
४ किमी व शिरपूर जैन पासून दक्षिणेस अंदाजे १२ किमी अंतरावर आहे. या गावाच्या लगतच गावखरी शेतात गणपतीचे छोटे जुने मंदीर आहे. गणपतीची मुर्ती पाषाणाची असून गणपती उजव्या सोंडेचे आहेत. पूर्वाभीमुख असणारी शंदूर लावलेली गणशाची मुर्ती अतीशय मोहक आहे. सदर्हू देवस्थान देशपांडे घराण्याचे परंपरागत मालकीचे व खाजगी आहे. या मुर्तीची स्थापना १५० वर्षापूर्वी झालेली आहे. या देवळाचे संस्थापक कै. श्री बळवंतराव देशपांडे यांनी ही पाषाणाची मुर्ती स्थापन करून हे देऊळ बांधले व येथे ते गणपतीची भक्ती व आराधना करू लागले. यापूर्वी कै. बळवंतराव सरकारी हुद्यावर कार्यरत होते. ती नौकरी सोडून ते पार्डीस आले व श्री. गणेशाची स्थापना करून त्यांनी आराधनेस सुरूवात केली.
बळवंतरावांना तीन पुत्र होते. भालचंद्र, मुद्गल व हरिशचंद्र. पैकी मुद्गल हा अवतारच होता. तो आपल्या स्वस्थानि तिघुन गेला. भालचंद्र हे पिता-पुत्र गुरुशिष्य होते. बळवंतांनी आपला पुत्र भालचंद्र याला परिपुर्ण केले. त्यांनीही गणपतीची भक्ती करून गणपतीला प्रसन्न केले. वरील दोघेही पितापुत्रांचा शिष्य परिवार होता. बळवंतराव समाधिस्त झाल्यावर भालचंद्र यांनी भक्ती साधना सुरूच ठेवली. भालचंद्र यांनी शके १८२२ मध्ये गणपतीची पार्थीव मुर्ति हातात घेऊन जीवंत समाधी घेतली. त्यांचे पट्टशिष्य श्री. भगवंत गुरूजी जे वाशीमचे झिंगरी जोशी म्हणून ओळखले जातात त्यांनी गणपतीची २१ अध्यायी श्री सद्गुरु लीलामृत या नावाने पोथी लिहीली. त्यांची समाधी वाशीमच्या पद्मतीर्थावर आहे व त्यांचा मठ आर्वी जि. वर्धा येथे आहे.

याप्रमाणे पार्डीच्या मंदिराच्या परिसरातील भूमी परम पवित्र असून तपोभूमी आहे. जे भावीक दर्शनाला येतील, आपली मनोकामना व्यक्त करतील त्यांची ती इच्छा पूर्ण होते असा अनुभव अनेकांना आला आहे.
न लागता कष्ट सायास। कामना पूरति पार्डीक्षेत्रास॥
पार्डीच्या ह्या गणपतीची अष्टविनायकाच्या मालिकेत गणना नसली तरी याचे महत्व तेवढेच आहे. आजही १०-१२ वर्षापासुन हजारो भावीक भक्तगण संकष्टी चथुर्थीला येथे दर्शनास येतात. सकाळी ६ पासून ते रात्री १० पर्यंत दर्शनार्थींची गर्दी असते. त्या दिवशी एखाद्या यात्रेसारखे स्वरूप पहावयास मिळते.येथे लोकांनी पाण्याची व्यवस्था केली आहे. निवास, स्वयंपाक-पाकगृह, भांडीकुंडी अशा सर्व व्यवस्था तेथे केल्या आहेत. येथिल परिसर रमणीय आहे. या परिसयाची जवळ जवळ एक एकर जमिन चारही बाजूला कुंपणाने सुरक्षित केली आहे. याच परिसरात एक विहीर आहे. त्यात नर्मदा प्रगट झाली आहे असा भक्तांचा दृढ विश्वास आहे. हे संस्थान पार्डीकर देशपाण्डे घराण्याचे खाजगी मालकीचे आहे. सध्या संस्थान्चे कारभार व व्यवस्थापन श्री. पद्माकर देशपांडे, परभणी व श्री प्रभाकरराव देशपांडे, रिसोड हे पाहतात.

संग्राहक- प्रभाकर देशपांडे पार्डीकर, रिसोड (०७२५१-२२२६९०)

Sunday, February 1, 2009

श्री आप्पास्वामी संस्थान (आसन)रिसोड

श्री आपा स्वामी महाराज संस्थान रिसोड या ठिकाणी आपास्वामी महाराजांची संजिवन समाधी असुन त्यालाच आसन असे जनसामान्याकडून संबोधण्यात येते. ह्याच रिसोड/ऋषिवट गावी शॄंगाल सरोवरा निकट शिंगाळा (श्री क्षेत्र क्षीरसागर) हे श्री आप्पा स्वामी महाराजांचे तपश्चर्या करण्याचे ऐतीहासीक स्थान आहे. श्री पिंगलाक्षी देवी मंदिराच्या मागील भागाला शिंगाळा हे ठिकाण आहे. जवळच गोरक्षनाथ यांची टेकडी आहे. नाथ महाराजांच्या “आम्ही राहतो माळावरी, तुम्ही बैसावे क्षीरसागरी” या उक्ती नुसार श्री आप्पा स्वामी महाराजांनी तपश्चर्येसाठी हे स्थान निवडले असावे. ते दत्तात्रेयांचे अनुग्रहीत होते. शिंगाळा हे ठिकाण घनदाट अरण्यात स्थित आहे. हे ठिकाण अतीशय रमणीय व निसर्ग सौंदर्याने नटलेले ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक पशु-पक्षी पहावयास मिळतात.
रिसोड मधील श्री आप्पास्वामी संस्थान (आसन)
रिसोड नगरिच्या पश्चिमेच्या परिसरात श्री आप्पा स्वमी संस्थान (आसन) आहे. याठिकाणी महाराजांची संजिवन समाधी आहे. येथे महाराजांचे वास्तव्य होते. संस्थानाच्या भव्य वास्तूत त्यांच्या काळातील अनेक वस्तू संग्रहीत आहेत. संस्थानाला अतिशय भव्य प्रवेशद्वार आहे. त्यानंतर मुख्य वास्तूत चौखाणी बैठक, ध्यानकक्ष, व गाभारा आहे. ह्या गाभऱ्यातच म्हाराजांची संजिवन समाधी आहे. तसेच त्यांची पत्नी विरामाय व पुत्र बाळस्वामी ह्यांची समाधी आहे. गाभाऱ्यात अखंड धुनी प्रज्वलीत आहे व त्याचप्रमाणे अखंड नंदादीप तेवत असतो. गेली चारशे वर्षे नंदादीप व धुनी अखंड प्रज्वलीत आहेत.
पूर्वेकडे ऐसपैस वाडा व शिखर मंदीर आहे. या शिखर मंदीरात त्यांच्या कुलातील व्यक्तींच्या समाध्या आहेत. त्याच प्रमाणे वाड्यात विघ्नहर्ता श्री गणेशाचे व विठ्ठल रखुमाईचे छोटेखानी देव्हारे आहेत. मंदिरावरील भव्य असा पांढरा शुभ्र ध्वज गेली चारशे वर्षे आपली परंपरा जपत आहे. ह्याच वाड्यामध्ये गौरक्षण व पाकशाळा आहेत. प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर ध्यानकक्ष व समाधी भागात पाय धुवून प्रवेश करण्याची पद्धत आहे. त्याकरीता प्रवेशा नजिकच विहीर व हौद आहेत. भावीक विहिरीचे पाणी काढून नंतर हात पाय धुवूनच वास्तूत प्रवेश करतात.
रिसोड महात्म्य व महाराजांचे रिसोडला आगमन
एका आख्यायीकेनुसार द्वापार युगात पांडव वनवासात असतांना त्यांचे सत्वहरण करण्यासाठी कौरवांनी दुर्वास ऋषीसह अनेक ऋषी मुनिंना पांडवाकडे पाठवले होते. त्यावेळी पांडव ऋषिवट ग्रामीच होते. येथे येवून ऋषींनी द्रौपदीस रात्री भोजन मागीतले होते. त्यावेळेस द्रौपदीने श्रीकृष्णाचा धावा करून त्यांना भोजन देऊन संतुष्ट केले होते. पुढे ते ॠषी या ठिकाणी वास्तव्यास राहीले त्यामुळे या ग्रामास ॠषीवट हे नाव मिळाले. रिसोड येथील एक आप्पास्वामी भक्त रखुमाबाई देशमुख यांनी महाराजांना आपल्या भक्तीने प्रसन्न करून येथे आणले. “महाक्षेत्र जाणोनी आलो या ऋषीवट धामा” या महाराजांच्या रचनेनुसार या गावाचा महिमा थोर आहे.
श्री आप्पास्वामीं विषयी अधीक माहिती
श्री आप्पास्वामी महाराजांचा जन्म इ.स. १६०० मध्ये मराठवाड्यातील चारठाण या गावी झाला. त्यांना तिघे बंधु होते. महाराजांना बालवयापासुनच आध्यात्माची गोडी होती. वयाचे १३वे वर्षी ते विवाहबद्ध झाले. त्यांना एक पुत्र व दोने कन्यारत्ने प्राप्त झाली. पुढे त्यांना श्री दत्तात्रेयांचा अनुग्रह झाला व परमार्थिक अभ्यास करून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी वेचले. गुरू आदेशाप्रमाणे त्यांनी अभंग व पदावली यांची रचना केली. त्यामधुन त्यांनी उपदेश केला. त्यांना भेदभाव मान्य नव्हता. त्यांनी अंधश्रद्धेचे समाजातून उच्चाटन करण्यासाठी उपदेश व अखंड कार्य केले. समाजातील अनिष्ट प्रथा व परंपरा नष्ट करण्यासाठी त्यांनी अविरत कार्य केले. मानवता धर्म सर्वश्रेष्ठ आहे असे प्रतिपादने त्यांनी अभंग व पदावली यातून केले. ते सर्वधर्म सहिष्णू होते.
“लखलखाटे सोई न जाने कोई
हिंदू मुस्लिम दोनो भाई
अग्यान लखमाने ज्योत से ज्योत मिलाई”
वरील रचनेवरून त्यांनी हिंदू मुसलमान एकीकरण व्हावे हे प्रतिपादन केल्याचे जाणवते. त्यांना तीन नावांनी संबोधण्यात येते. “लखमा, लक्षधर व आप्पास्वामी”
श्री आप्पास्वामी संस्थानातील कार्यक्रम
येथे नित्य त्रिकाल पूजा होते व त्यानंतर पंचपदी होते. प्रत्येक एकादशी ला भजन नियमाने होत असते. भक्तांच्या आयोजनाप्रमाणे अनेकवेळा जागर व शरण आणि नंतर अन्नदानाचा कार्यक्रम होतो. संस्थानचा वार्षीक उत्सव हा श्रावण महीन्यात असतो. हा उत्सव भक्त मंडळी संपूर्ण श्रावण महीनाभर साजरा करतात. पोळा व कर ह्या दोन दिवशी महत्वपूर्ण कार्यक्रम होतात. त्यामध्ये दहीहंडी, लळीत, अन्नदान ईत्यादी कार्यक्रम होतात. याकाळात संस्थानात हरिविजय या ग्रंथाचे नित्यवाचन होते. पोळ्याचे दुसऱ्या दिवशी या वार्षीक उत्सवाची अन्नदान करून सांगता केली जाते.
महाराजांनी भक्तांना त्याकाळी अभंगरुपी उपदेश केला आहे जो आजही लागू पडतो. संपूर्ण भारतात श्री आप्पास्वामी महाराजांची ३६५ ठिकाणे आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी महाराज स्वतः गेलेले आहेते म्हणून तेथील भक्तांनी त्या त्या ठिकाणी स्थान मंदिरांची स्थापना केली आहे. आम्ही पाहीलेले रिसोड येथील हे ऐतिहासीक स्थळ चारशे वर्षांच्या अखंड परंपरा व संस्कृतीचे प्रतीक आहे. हे ठिकाण अतीशय रमणीय व शांततापूर्ण आहे. या ठिकाणी गेल्यास आध्यात्मीक ओढ निर्माण होऊन आध्यात्माकडे जाण्याची प्रेरणा मिळते. वरील सर्व माहिती सध्या गादीवर विराजमान असलेले श्री हर्षवर्धन महाराज यांच्या आदेशाप्रमाणे आप्पास्वामी महाराजांचे भक्त श्री यादवराव बाळाजी बुट्टे यांनी श्रींची पदावली व अभंगांचे आधारे उपलब्ध करून दिली आहे.
संकलन- नितेश यादवराव बुट्टे, रिसोड
अधीक माहिती साठी श्री नितेश बुट्टे यांना संपर्क ०७२५१-२२२५४९ या दुरध्वनी क्रमांकावर साधावा.

Monday, January 19, 2009

रिसोड नगर परिषद- नगर सेवकांची यादी- जाने २००९

निवडणुक दिनांक- २० जानेवारी २००९
मतमोजणी दिनांक- २१ जानेवारी २००९
विद्यमान नगर सेवकांची यादी
वार्ड क्र. १ - श्री. चंद्रशेखर देशमुख
वार्ड क्र. २ - श्री. दिपक पौळ
वार्ड क्र. ३ - श्रीमती यास्मीन अल्मास
वार्ड क्र. ४ - श्री. पवन कमलकिशोर छित्तरका
वार्ड क्र. ५ - श्री. किरण भगवानराव क्षीरसागर
वार्ड क्र. ६ - प्राचार्य विजय तुरूकमाने
वार्ड क्र. ७ - श्री. विष्णू खराडे
वार्ड क्र. ८ - श्रीमती गोदावरी पुंडलिक मोहळे
वार्ड क्र. ९ - श्री. शे. यासीन कुरेशी
वार्ड क्र. १० - श्रीमती रेखा हरिभाऊ धुमाळ
वार्ड क्र. ११ - श्रीमती सुमन लक्ष्मण कदम
वार्ड क्र. १२ - श्रीमती ज्योती अरूण मगर
वार्ड क्र. १३ - श्री. वसंतराव इरतकर
वार्ड क्र. १४ - श्री. यशवंत निळकंठ देशमुख
वार्ड क्र. १५ - श्रीमती प्रतिभा उल्हास झडपे
वार्ड क्र. १६ - श्री अहमद फयाज
वार्ड क्र. १७ - श्री सदाशिव चौधरी

Monday, December 8, 2008

पिंगलाक्षी देवी व भर च्या आसरामाता Pinglakshi Devi and Aasra Mata of Bhar






रिसोडला देवी देवतांचे महत्त्व मोठेच आहे. नवरात्राच्या कालावधीत पिंगलाक्षी देवी च्या दर्शनाला जाणाऱ्यांची संख्या मोजण्याचा प्रयत्न केल्यास येणारा आकडा रिसोडच्या लोकसंख्ये एवढा येईल हे नक्की. या काळात पहाट, सकाळ, दुपार व संध्याकाळी भाविकाची गर्दी लोटलेली असते. देवीच्या परिसरात असणाऱ्या सुंदर व प्रशस्त तलावावर हात पाय धुऊन दर्शन घेणे, त्या नंतर घरून डब्यात आणलेले खाणे , वडाच्या पारंब्यांना लटकणे, हुंदडणे, तलावात पोहणे, फरशीच्या पाण्यात पाय मोकळे सोडून डबा धुता धुता मासे पकडणे (हौशेखातर-विरंगुळा वगैरे म्हणून) असा उपक्रम चालतो. या ठिकाणचे ऐतिहासिक महत्त्व व संबंधीत घडामोडी यथावकाश रिसोड कट्ट्यावर प्रकाशीत होतीलच.
दसऱ्याचे दिवशी तर संध्याकाळी सीमोल्लंघन करण्यासाठी अमाप जनसमुदाय लोटला असतो. दसऱ्याला पिंगलाक्षी देवी ला जाऊन सीमोल्लंघन करणे म्हणजे रिसोडकरांच्या जीवनातल्या अविस्मरणीय आठवणींपैकी एक आहे. काही लोक ज्यांचे कडे स्वयंचलित वाहने आहेत भरच्या आसरा मातेला (रिसोड-भर अंतर ६ किमी)सुद्धा जाऊन सीमोल्लंघन करतात. हा अनुभव सुद्धा खूप सुखद आहे. संध्याकाळच्या वेळी भर हून परत येताना मनाला वाटणारी अनामिक हुरहुर खूप हवीहवीशी वाटते.
ता.क.-सध्या समाजातील काही स्वयंसेवकांचे पुढाकाराने पिंगलाक्षी देवीच्या प्रांगणात विश्वशांती साठी महाजप व हवन सुरू आहे. निश्चित केलेली जपाची संख्या पूर्ण करण्यासाठी हे कार्य सतत वर्ष भर करावे लागणार आहे. त्यापैकी ३/४ कालावधी पूर्ण झाला आहे. त्यांना शुभेच्छा!

Tuesday, November 25, 2008

रामभाऊ पेपरवाला (आर. के.)

जीवनात असा एखादा प्रसंग घडून जातो की, आपण त्या क्षणी अवाक होतो. आपल्या संवेदना किंवा जाणीवेचा काटा शुन्यावर स्थीर होतो. ती गोष्ट किंवा प्रसंग घडून गेल्यानंतर आपण त्याचे उगाचच विश्लेषण करत बसतो.. त्याचे कोडे उलगडण्याचा निष्फ़ळ प्रयत्न करतो. परंतु त्याला काहीच अर्थ नसतो. काही प्रसंग साधेच घडून जातात. पण ते आपला मनात कुठेतरी खोलवर रुतून बसतात.
असाच एक प्रसंग मला अनुभवावयास मिळाला. मी आणि माझ्या मित्राने कॉलेजचे शेवटचे वर्ष पूर्ण केले होते. निकालही लागला आणि आम्ही बेकारीच्या शीडीवर पहीली पायरी चढली. आता रोज वर्तमानपत्रातील नोकरीच्या संधी व जाहीराती पाहणे आवश्यक होते. रिसोडला सार्वजनीक वाचनालय असल्यामुळे प्रत्येक वर्तमानपत्र दररोज पहाणे एक कठीण समस्याच होती. त्यावर उपाय म्हणजे रामभाऊ पेपरवाले. सर्वजण त्यांना रामभाऊच म्हणत असत. हा रामभाऊ बस स्थानकावर फ़ीरत पेपर विकत असे. तो आम्हाला आम्ही बेरोजगार असल्यामुळे प्रत्यक पेपर जाहीराती बघण्यासाठी अगदी विनामूल्य चाळू देत असे. त्याच्या या चांगुलपणासाठी आम्ही त्याचे नेहमी आभार मानत असू. असा हा रामभाऊ परिस्थितीने व स्वभावाने अतिशय गरीब होता. पण त्याच्यात एक दुर्गुण होता. तो म्हणजे त्याचे तळीराम असणे. तो भयंकर मद्यपी होता. रामभाऊ आणि दारु असे समिकरणच झाले होते. त्याला पैशाची निकड भासली की तो नेहमी मला दारुसाठी पाच रुपये मागत असे. तेंव्हा त्याला मी सांगितले, "रामभाऊ माझ्याजवळ एक पेपर घेण्यासाठी पैसे नाहीत, तेंव्हा तुला मी पाच रुपये कुठुन देणार?" तेंव्हा रामभाऊने ," काही हरकत नाही तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे, तुम्हाला जेंव्हा नौकरी लागेल तेंव्हा पाच रुपये नक्की द्याल." असे म्हणून माझ्याकडून त्याने तसे पक्के वचन घेतले. दरम्यान आमचा वर्तमानपत्रातील नोकरीच्या संधी पाहणे, अर्ज करणे, परीक्षा देणे असा नित्यक्रम चालूच होता. सुदैवाने पुढे काही काळानंतर मला नोकरी मिळाली. नंतर नोकरी व इतर व्यापात इतका गर्क झालो की, रामभाऊला व त्याला दिलेल्या वचनाला मी साफ़ विसरून गेलो. असाच एकदा परगावी जाण्यासाठी मी बसस्थानकावर उभा असतांना एकदमच रामभाऊ माझ्या समोर प्रगटला व "बरेच दिवसात दिसला नाही कुठे गावाला वगैरे गेला होता काय?" असे मोठया आस्थेने विचारीत"आज पेपर पहायचे नाही काय?"असे बोलला. रामभाऊ समोर दिसल्या बरोबर मी त्याला दिलेल्या वचनाची एकदमच आठवण झाली. मी खिशातील पाच रुपये काढून त्याचे हाती देत म्हणालो,"रामभाऊ, आता मला नोकरी लागली आहे, आणि माझ्या वचनाप्रमाणे तू हे पाच रुपय घे." त्याने पैसे परत करत म्हटले की मी महीन्यापूर्वीच दारू सोडली. मी आश्चर्याने जवळ जवळ उडालोच. मी त्या आश्चर्याच्या धक्क्यातू सावरत म्हटले रामभाऊ ही तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. नंतर मी त्याला आणखी पाच रुपये देऊ केले. परंतू रामभाऊने त्याला साफ़ नकार दिला. व त्याने म्हटले, "मी तुमच्या कडून एक हाफ़ चहाच घेईन, मला फ़क्त पन्नास पैसच द्या." मी यांत्रिकपणे त्याला पन्नास पैसे दिले. तो परत माघारी वळला आणि "पेपर... पेपर..."करीत गर्दीत दिसेनासा झाला. मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अवाक होऊन बघतच राहीलो...

लेखक: रावसाहेब देशपांडे.

रावसाहेब उर्फ़ विजय देशपांडे सध्या रिसोडलाच स्थित असून ते सध्या महागांव-बाळ्खेडा इत्यादी ग्रामिण परीसराचे पटवारी आहेत. ते महाराष्ट्र शासनाच्या "आदर्श पटवारी " पुरस्काराचे मानकरी आहेत आणि निष्ठावान व कार्यकुशल कर्मचारी आहेत.


या अनुभव लेखनातील रामभाऊ पेपरवाला हे "आर. के" या नावाने रिसोडला १९८० ते २००० या काळात प्रसिद्ध होते. पांढरे कपडे, वर्ण काळा, शिडशिडीत बांधा, कुरळे (काळे/पांढरे) केस, भिंगाचा चष्मा व डाव्या हातात पेपरांचा गठ्ठा असा त्यांचा वेश होता.

Friday, November 21, 2008

रिसोडकर होण्यासाठी काही अटी

आयुष्यात एकदातरी चोरून पोहायला जाणे
• गल्लीतल्या अतिशय चिंचोळ्या जागेत जास्तीत जास्त वेळ क्रिकेट खेळण्यात घालवणे
• निदान एकदा तरी शाळेतून पळून जाण्याचा अनुभव गाठीशी असणे
• आपली शाळा सोडून इतर शाळा म्हणजे नुसता बाजार आहे असे समजणे
• कुठल्याही निमित्ताने का होईना लोकांना जेवू घालण्यासाठी कारणे शोधत असणे.
• तरुणपणी आपल्या गल्लीतल्या सर्व लोकांची व त्यांचे कामांची जवाबदारी आपल्या व गल्लीतल्या इतर समवयस्कांचे खांद्यावर आहे अशा आविर्भावात सर्वत्र वावरणे व अनुरूप विधाने करणे.
• मुलाने वडिलाशी कमीत कमी संभाषण करण्यातच धन्यता मानणे
• गुजरी चौकात एकदातरी गाडी उभी करून ट्रॅफिक जाम करण्याचे स्वप्न उराशी बाळगणे
• राजकारणावर हिरहिरीने गप्पा मारणे तथा कपड्यांसारखेच पक्ष निष्ठा आणि नेते बदलणे
• रिसोडला जो गाडी (दुचाकी व चार चाकी वाहन) चालवतो तो जगात कुठेही गाडी चालवू शकतो असे आपल्या पाहुण्यांना वारंवार ठासून सांगण्याची सवय असणे.
• कुणीही घर बांधले की याने पैसा खाल्ला अशी बोंब करणे
• नवी नोकरी लागताच एखाद्या महिन्यातच एक नवी कोरी बाइक विकत घेणे
• कधीही, कुठेही व केव्हाही भांडणाचे तयारीत असणे
• स्वतःचे शिक्षण संपल्यावर रिसोडच्या शिक्षकांना काहीच येत नाही व त्यामुळे आपले खूपच नुकसान झाले आहे अशा आशयाची विधाने करणे
• शहरात शिकायला जाऊन अखेरीस रिसोडलाच नोकरी किंवा व्यवसाय करणे, कारण बाहेर काहीच नाही, त्यापेक्षा इथेच जास्त कमाई आहे असे सांगणे.
• म्हातारपणी असे वारंवार विधान करणे की आमच्या काळात खूपच शिस्त होती व आताची पिढी म्हणजे , “येत कायी नायी आन पैसा खर्चायले पायजे.”
• विशेषतः शाळेत असताना व लग्नापूर्वी कुठल्या तरी आखाड्याशी किंवा तत्सम गटाशी निगडित असणे
• दर सहा महिन्यांनी एखाद्या नवीन साधू-महात्म्याच्या (!) मागे धावणे
• नोकरी/व्यवसायाचे कारणाने रिसोड सोडलेल्यांनी आपल्याला आता लवकरच येत्या काही वर्षात रिसोडला परत जावयाचे आहे असे आप्त स्वकीयांना सांगणे व मरे पर्यंत जायचे मात्र नाही असे करणे.
• रिसोडला हा कसाही जगो पण परगावी गेल्यावर शहरातील लोकांना आपण लहानपणी छोट्या गावातील आयुष्य आपण कसे “एन्जॉय” केले याची रसभरित वर्णने सांगणे
• कोणी कोणाची कशी फसवणूक केली व कोणाचा फायदा झाला यावर वारकाच्या दुकानात तासानं तास गप्पा मारणे
• संध्याकाळी पान/मट्रेल किंवा खर्रा खाऊन ’एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याचे कसे चुकले अथवा त्याने काय करायला हवे होते’ हे चौकात चार चौघांना पटवण्याचा प्रयत्न करणे व त्यायोगे इतरांचे लक्ष वेधून घेणे
• आपले नोकरी/व्यसायाशिवाय इतर विषयातच अधिक लक्ष घालणे व आपणे फारच एक्सपर्टआहोतअसे भासवणे
• शत्रू असो की मित्र पण सुख-दुःखाचे प्रसंगी आवर्जून पाठीशी असणे
• सण/उत्सव/ साजरा करताना जात, पात, धर्म न बघता सर्वांना आपल्या आनंदात सहभागी करून घेणे.

Monday, November 17, 2008

गंगा मॉं (संतअमरदास बाबा) उद्यान

आमच्या लहानपणी रिसोडला लहान मुलांना नेण्य़ासाठी किंवा खेळायला जाण्यासाठी एकही पार्क, बाग किंवा उद्यान नव्हते. आम्हाला शहरात गेल्यावरच उद्यान-बाग काय असतं ते बघायला मिळत होते. तसे शाळेची सहल पैठण ला गेल्यावर सुद्धा उद्यान पहावयास मिळाले होते!

यावर्षी (ऑक्टोबर-२००८) मी दिवाळीला रिसोडला गेलो असताना अमरदासबाबांच्या मंदिरा जवळील उद्यान बघण्याचा योग आला. ते खरेच अत्यंत चांगले उद्यान आहे. मुलांना खेळणे बागडणे यासाठी भरपूर जागा तेथे आहे. मुलं-मुली तेथे मनसोक्तपणे बागडत होती. बघून खूप बरे वाटले. सवलतीच्या दरात तिकीट विक्री असते (रुपये दोन पेक्षा जास्त नाही). तेथे खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांना सहजच म्हणून त्यांची नावे विचारली तर अमन, राधा, राजू, सायरा व मुकद्दर अशी त्यांची नावे ऐकून खूपच आनंद झाला. सोबत कॅम होताच. काही छायाचित्रे घेतली. एका छायाचित्रात त्या उद्यानातून श्री. सातारकर बाबा आश्रमातील देऊळ दिसते आहे. छायाचित्रे संध्याकाळी घेतली आहेत. म्हणून थोडी अंधुक आली आहेत...... रिसोडकर







Saturday, November 15, 2008

ओळख रिसोडशी

जेथे लोकांचे एकमेकांवर खूप प्रेम व विश्वास आहे.
कुणीही कुणाचेही घरी जेथे आधी न कळवता हक्काने जाऊ शकतो.
संत अमरदास बाबांचा जेथील लोकांना सहवास लाभला.
आप्पा स्वामी , सिद्धेश्वर, गजानन महाराज अशी जागृत देवस्थाने जेथे आहेत.
एका कोपऱ्यातील छोटेसे कोपरेश्वर संस्थानही संबंध बेंदरवाडीची जेथे शोभा वाढवते.
पिंगलाक्षी देवी, गोरखनाथ किंवा शिंगाळ्याला जाऊन जेथे लोक जेथे ट्रेकिंग करतात.
जैनांच्या प्राचीन मंदिरात भाद्रपद जेथे साजरा करतात.
जेथे गणेश मंदिरात भल्या पहाटे कुडकुडत भक्तिरसाने ओथंबलेली काकड आरती अबाधीतपणे करतात.
वेगवेगळ्य़ा काळ-ऋतू परत्वे जेथील लोक देवाची उपासना करतात.
जेथे एखादी सीक्रेट गोष्ट वाऱ्यापेक्षाही वेगाने पसरते.
तिरूपतीच्या श्री. बालाजीला गाडी करून दर्शनाला जाण्याची जेथे चढाओढ असते.
जेथे क्रिकेटचा, पोहण्याचा, भुतांच्या गप्पा मारण्याचा, संध्याकाळच्या शेकोटीचा असा एक खास सीझन असतो.
जेथे सर्वांनीच एकाच प्रकारचे वाहन (ट्रॅक्स गामा)खरेदी करण्यात धन्यता मानली जाते.
तारुण्यात पदार्पण करण्यासाठी जेथे जैन पान मंदिर या पानपट्टीवर जाऊन उभे राहावे लागते.
उन्हाळ्यात मध्यरात्री पाणी भरणे, नवरात्रात भल्या पहाटे देवीला जाणे अशा अनेक गोष्टींचे जेथे आगळे महत्त्व आहे.
बाळसमुद्राच्या संबंधीत जेथे अनंत आख्यायिका जेथे ऐकवल्या जातात.
पाऊस पडण्यासाठी जेथे अनेक कर्म-कांडे व भंडारे होतात.
एकाच घरातील दोन उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात जेथे आमनेसामाने उतरतात.
त्या रिसोड गावाशी माझे कायमचे रेशिमबंध आहेत.
रिसोडच्या त्या प्रत्येक गोष्टीचा मी चाहता आहे.
त्या रिसोडच्या अनेकांशी माझे ऋणानुबंध आहेत.
त्याच रिसोडच्या प्रत्येकाशी मला काही तरी देणे लागते!